जीवनपट

स्वामी समर्थाचे आशीर्वादाने व
माझ्या आई-वडिलांचे आशीर्वादाने

नाव: रामहरी दिनकर गोसावी
परंतु राजीव गोसावी या टोपण नावानेच मला सर्वजन ओळखतात

आमचे मुळ गांव शिर्सु्फळ, ता.बारामती , जि.पुणे हे आहे.या गावी आम्हांस
शेती असून ती आमचे चुलते पाहत आहेत. उदरनिर्वासाठ माझे वडील लासुर्णे
ता.इंदापूर , जि.पुणे येथे १९५० साली स्थायिक झाले.

माझा जन्म १९ सप्टेंबर १९६८ (नोंद १९/०६/१९६७) रोजी लासुर्णे
(टकलेवस्ती) ,ता. इंदापूर जि.पुणे या ठिकाणी झाला.माझे वडील माधुकरी 
(भिक्षा) मागत असत.त्याचप्रमाणे पोथी वाचन सत्यनारायण सांगणे ,लग्नातीलविधी सांगणे,
लग्नाचे विधी सांगणे अशा प्रकारचे धार्मिक विधी करत असत.

आमच्या घरामध्ये आम्ही चार भावंडं होतो. मला तीन बहिणी आणि सर्वात लहान मी होतो.वडिलांच्या धार्मिक विधीवर खर्च चालत असे. साधारण १९७० मध्ये माझे वडील लासुर्णे (जळकवस्ती)या ठिकाणी राहण्यासाठी गेलो.

आमचे घर कैकाडी कुडाचे होते. त्यावर पत्रा होता मध्ये ओटा व रांजण पुढे तुराठ्याची झोपडी होती. तिथे स्वयंपाक घर होते. आमच्याकडे दोन शेळ्या होत्या. त्या रात्री झोपडीत आम्ही बांधत असू. दोन वेळा आमची झोपडी रात्री कोणीतरी पेटवून दिली होती.

सन १९७३-७४ मध्ये लासुर्णे या गावी जीवन शिक्षण मंदिर या शाळेत माजे नाव दाखल करण्यात आले. पहिल्याच वर्षी मी पहिलीत नापास झालो. पुन्हा त्याच वर्गात म्हणजे १९७४-७५ मध्ये परत इयत्ता पहिली आमचा वर्ग हिरा काकांच्या दुकानासमोरील मोठ्या पत्र्याच्या शाळेत भारत असे. इयत्ता दुसरी चा वर्ग १९७५-७६ ग्रामपंचायत समोरील कौलारू शाळेत भरत असे. इयत्ता तिसरी चा वर्ग १९७६-७७ त्या वेळेस गावाबाहेर ४३ फाट्याजवळ शाळा होती. १९७७-७८ मध्ये मी चौथी पास झालो. समाजातील लोकांनी खूप त्रास दिला आणि आम्ही लासुर्णे गावातील घर दर विकले.

वडिल्याच्या माधुकरी(भिक्षा) वर भागात नव्हते. त्यामुळे आईने वालचंद नगर या ठिकाणी भाजी पाल्याचा व्यवसाय करण्यास सुरवात केली. आम्ही वालचंद नगर येथे भाड्याने खोली घेतली व तेथे राहू लागलो. वालचंद नगर या ठिकाणी आमचा भाजी पाला विक्रीचा गाळा होता. त्याठिकाणी भाजी चा व्यवसाय चाले. मी आईला खूप त्रास देत असे, त्यामुळे आईने मला होटेल मध्ये कामाला पाठवले. वालचंद नगर च्या बाजार पेठेत 'रसना' होटेल होते. तेथे काम करू लागलो. वालचंद नगर येथे राहिल्यावर कधी कधी वडलांबरोबर सायकलीवर बसून मेन कॉलनी, पोस्ट कॉलनी ४४ या ठिकाणी जाऊन रद्दी घेऊन यायचो. 

१९७९ साली लासुर्णे येथे परत राहिला आलो. गावातील काही लोक आई वडिलांना सांगत होते, एक मुलगा आहे, त्याला शिक्षण द्या. सर्वानी सांगितल्यावर पुन्हा गावी आलो. तेथे बेघरांची वसाहत सरकारी घर विना मूल्य राहवयास मिळाले. सन १९७९-८० साली इयत्ता पाचवी मध्ये माझे नाव निलकंठेश्वर विद्यालय लासुर्णे या ठिकाणी टाकण्यात आले. इयत्ता पाचवी चा वर्ग सुरु झाला. त्या काळात अभ्यासात लक्ष लागत नव्हते. कसातरी इयत्ता सहावी पास झालो. आईला वाटले याला दुसरी कडे शिक्षणासाठी पाठवू म्हणून इयत्ता सातवीला मांडकी ,ता.माळशिरस, जि. सोलापूर या ठिकाणी बोर्डींगला घातलं.आठ दिवस राहिलो, पण तेथे मन रमेना.शेवटी माझी मोठी बहिण माळीनगर,ता. माळशिरस या ठिकाणी राहत होती.त्या ठिकाणी मॉडेल विविधांगी प्रशाला आहे तीथे इयत्ता सातवी मध्ये नाव घालण्यात आले.परंतु अभ्यास केला नाही, शाम चित्रपटगृह माळीनगर, श्रीराम, महात्मा (अकलूज) या ठिकाणी चित्रपट पाहत असे.परिणामी सातवी नापास झालो.पुन्हा लासुर्णे येथे सातवीसाठी प्रवेश घेतला.अभ्यास करू लागलो. रेडीओ ऐकण्याचा छंद लागला.आकाशवाणी पुणे केंद्राला पत्र पाठवायचो,लोभ असावा या कार्यक्रमात नाव आलं की बर वाटायचं बिनाका गीतमाला आवडीने ऐकत होतो. सांगली , पुणे, जळगांव, मुंबई, सिलोन या केंद्रावरील कार्यक्रमही खूप ऐकत होतो. एकदा हिंदी कार्यक्रमासाठी कलाकारपाहिजेत असे जाहीर करण्यात आले.तेव्हा अर्ज पाठवला होता.त्यावेळी इयत्ता नववीत होतो.पुणे केंद्राची परीक्षा दिली पास झालो.


लासुर्णे या गावाशेजारी बेलवाडी नावाचे गावं आहे. तीथे अनिल जाधव , भिसे हे नाटक बसवाचे,मी रोज जायचो .बेलवाडीला एका गाण्याच्या कार्यक्रमात 'दे टाळी मला ' हे देवता चित्रपटातील मंद जगताप यांच्याबरोबर गीतावर नृत्य केले खूप वाहवा झाली.पुढे आपल्याला नट व्हायचे आहे या हटटापाई रु.३००/- घेऊन माझ्या मेहुण्याबरोबर मुंबईला गेलो. साधारण दिवसरभर रिक्षाने फिरलो. पुन्हा घरी म्हणजे लासुर्णे गावी आलो १९८३-८४ साल असावे. दर रविवारी वालचंदनगर येथे सायकलवर फिरून कडीपत्ता विकला.

त्या काळात रोकडे नावाचे मुख्याध्यापक शाळेत होते. त्यांनी अशी प्रथा सुरु केली की,आठवडयाच्या साप्ताहिक वार्तापत्र एका विद्यार्थी वाचून दाखवत असे.माझे नाव श्री. पी. ए. पाटील सर यांनी सुचवले आणि 'दर शनिवारी सकाळी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजीव गोसावी आपल्या समोर साप्ताहिक वार्तापत्र सादर करत आहे ' या कार्यक्रमामुळे सभाधीटपणा आला. त्याच काळात मी दाढी मिशा काढल्या तेव्हा तर आश्चर्यचाकीत झाले.त्यावेळी सर्वाना वाटले मी नट होणारच . इयत्ता नववीमध्ये अभ्यासात लक्ष्य लागत नव्हते परिणामी नववी नापास झालो. पुन्हा नववीत बसलो अभ्यासात लक्ष घातले. त्यावेळेस १९८६ साली पुणे केंद्रावर हिंदी कलाकार पाहिजेत अशी जाहिरात आली तेथे अर्ज केला , परीक्षा दिली, पास झालो. मुंबईचे पत्रकार सत्यवान तोटांबे यांनी रंगभूमी चित्रपट डायरीमध्ये माझे नाव छापले. डायरीत नाव आले, क्षणभर आपण कलाकार झालो असे वाटले. १९८७ साली डायरी सर्व गावात दाखवत होतो.१९८६-८७ साली मी दहावी पास झालो.

२९ मे १९८७ रोजी वडीलांबरोबर सत्यवान तोटांबे यांच्या घरी बोरिवली (मुंबई ) येथे गेलो.३० मे १९८७ रोजी वडिलांबरोबर प्रभाकर पणशीकर यांचेकडे गेलो. तेथे पंत म्हणाले, हा मुलगा लहान आहे,
तरीही त्यांनी पुढे तो मी नव्हेच या नाटकात 'टायपिंग करणारा मुलगा' म्हणून काम केले. एक प्रयोग केला. मानधन रु. ५/- मिळाले होते. नंतर त्याचदिवशी नाना पाटेकर यांना भेटलो. वडिलांबरोबर 'पुरुष' नाटक पाहिले होते. नंतर वडील गावी आले. मी मुंबईला राहिलो. पुढे पाटकर कॉलेज गोरेगाव या ठिकाणी कॉलेजमध्ये प्रवेश केला. परंतु मराठी मिडीअम नसल्याने मी प्रवेश नाकारला. तोटांबे यांना सांगून मी पुन्हा गावी परत आलो. 

माझी बहिण गांधीनगर झोपडपट्टी महेंद्र अन्ड महेंद्रसमोर पिंपरी येथे रहात होती तीच्याकडे राहण्यासाठी आलो. मेहुणे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. तिथे तीन महिने राहिलो . त्यावेळी मला आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या कार्यक्रमाचे पत्र आले होते. ताबडतोब आकाशवाणी पुणे केंद्र येथे गेलो. 'बातचीत' हिंदी भाषेचा पाठ या कार्याक्रमाचा माझा सहभाग , मानधन रु.४४०/-. त्याकाळात कसबा पेठेतील खान यांच्याकडे राहिलो नंतर भवानी पेठेत टंडन यांच्याकडे राहिलो. कार्यक्रम रोज दुपारी १.५० ते २.०० असा होता. रेडीओमुळे खूप प्रसीद्ध झालो. ५०० पत्रे गावी पाठविली होती. भवानी पेठेमध्ये राहिलो. खानावळ देऊन सुद्धा घरातील सर्व कामे करावी लागत. नोव्हेंबर १९८७ रोजी बालाजीनगर (धनकवडी) येथे श्री. गोते यांचेकडे राहिलो.

नंतर २ महिने जयसिंग गोते त्यानंतर हडपसर १५ नंबर येथे श्री. शेंडगे सराच्या विनंतीवरून झारगड यांच्याकडे राहिलो. वायरमनचा कोर्स वाडिया कॉलेजचा होता तिथे प्रथम गॅदरींगच्या कार्यक्रमात निवेदन केले होते. त्याची कॅसेट तयार केली होती. ती लासुर्णे गावी दाखवण्यात आली होती. प्रत्येकी २५ पैसे असे रु. ३००/- मला मिळाले होते. नंतर मी दिघी येथे बाळासाहेब हगवने या मित्राकडे १५ दिवस राहिलो. वाडिया कॉलेजमध्ये ट्रायसेम योजनेंअतर्गत वायरमन कोर्स करीत असतांना दुपारचे जेवण नव्हते.सर्व मित्र डबा आणायचे त्यांच्यातच जेवत होतो ही एक आठवण आहे. १९८८ साली उषा चव्हाण यांच्या 'गौराचा नवरा' या चित्रपटात समूहनृत्यात भाग घेतला होता. त्यानंतर काही काळ स्वारगेट एस. टी. स्टॅड लाईन इले. गोसावी एस.टी. ड्रायव्हर यांचेकडे राहिलो. त्यांनी मला कारण नसतांना घराबाहेर काढले.

१९८८-८९ साली बहिण रामनगर, चिंचवड पुणे येथे रहावयास आली. तीचेकडे रहावयास आलो.१९८९-९० मध्ये शेजारीच कॉलेज होते. त्या टिकाणी ११ वी कला या वर्गात प्रवेश घेतला. माझा मित्र रमेश दळवी यांनी कॉलेज कर असे सांगितले. इयत्ता ११ वी व १२ वी पास झालो. कॉलेज चालू असतांना रेडिओवरून बातचीत कार्यक्रम चालू होता. वर्गात रेडीओ घेऊन आम्ही यायचो व ऐकायचो. १९९०-९१ साली बारावी पास झालो. बहिणीचा आधार संपला ते पुन्हा गावाकडे राहण्यास गेले. जगण्यासाठी नोकरी शोधू लागलो चिंचवडजवळील हॉटेल 'एमरॉल्ड पार्क' आहे, येथे आहुजा मॅनेजर यांच्या हाताखाली वेटरची नोकरी सुरु केली. १९९१-९२ साली एफ. वाय. बी. ए. चा अभ्यास चालू होता. नंतर १९९१-९२ साली शिवकृपा लॉज शिवाजीनगर येथे कॉट बेसीसवर राहण्यास आलो. या काळात मुंबईच्या सुधाताई करमरकर यांच्या नाटयप्रशिक्षन केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतले आहे.
त्यावेळी दिनक्रम-
सकाळी ०८:०० ते ०९:३० कॉलेज
०९:३० ते १०:०० ग्रंथालयात नोकरी
१०:०० ते १२:०० कॉलेज
दुपारी ०१:०० ते रात्री ११:०० पर्यंत हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली.

कालखंड १९९१-९७ 

कलाकाराच्या नकला करायचो , टीप चांगली मिळायची . शिवाजीनगर ते चिंचवडचा प्रवास सुरु होता. दरम्यानच्या काळात १९९४ साली मी बी. ए. पास झालो. वेळ मिळाला की कलाकारांना भेटत होतो. त्यावेळी बरेच कलाकार ओळखीचे झाले. निळू फुले, गिरीश ओक, प्रशांत दामले , विजय चव्हाण इ.. राजा गोसावी यांच्या घरी खूप वेळा गेलो होतो. त्यांचा सहवास मिळाला होता. प्रशांत दामले यांच्या मोरुची मावशी ह्या प्रयोगाच्या वेळी मी त्यांना आवाज सुधारण्यासाठी इलायची वडी आणून देत असे.

आकाशवाणी पुणे केंद्रावर युववाणी विभागात निवेदक म्हणून चार वर्षे काम केले. सर्व युवक मित्र मैत्रिणींना राजीव गोसाविंचा नमस्कार हे निवेदन करत असे. आकाशवाणीवर निवेदनाची नोकरी म्हणून खूप प्रयत्न केले पण फायदा झाला नाही. सन १९९४, १९९७ पर्यंत काम केले आणि आकाशवाणी येथील कामाची आशा सोडली. व्यासपीठावर निवेदन करण्यास मिळावे , चार पैसे मिळावेत असे वाटे आणि प्रयत्न सुरु केले. पुण्यातील सवाई गंधर्व कार्यक्रमाचे निवेदक आदरणीय श्री. आनंद देशमुख , कार्यक्रम अधिकारी हे माझा जेवणाचा डबा सलग चार वर्षे घरून आणत असत. देशमुख साहेब रजेवर असल्यावर उपाशीपोटी रेडीओवर काम करीत होतो. 

१९९४ साली मी सुतारवाडी, पाषाण पुणे येथ चाळीमध्ये राहण्यासाठी आलो. १९९७ साली आई वडील म्हणत होते की, आपले गांव शिर्सुफळ, ता.बारामती आहे. तिथे शेती आहे. आम्ही आहोत तोपर्यंत त्या गावी जाऊ आणि आम्ही शिर्सुफळ येथे गेलो. सहा महिने उघड्यावर राहिलो. जमीन मिळाली नाही. रिकाम्या हाताने पुण्यात परत आलो. त्याच काळात चिंचवडचे श्री. अशोक गोसावी यांनी पाहुण्यांना माझे नाव लग्नासाठी सुचवले . सादर श्री. अशोक गोसावी हे चिंचवड रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून सेवेत होते. त्यांच्या सांगण्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील वडाळी येथील मंगल नावाची मुलगी मी पाहून आलो.

जमीन नाही, हॉटेलची नोकरी सोडली, आकाशवाणीतून बाहेर पडलो आणि १९९७-९८ साली सुत्रसंचालक आणि निवेदकाची कामे शोधू लागलो. निवेदक म्हणून काम मिळविणे तसे खूप अवघड. एकसुधा पेपर विकत घेता येत नव्हता. सार्वजनिक वाचनालयात जाऊन पेपर वाचणे, कामे शोधणे. १७ मे १९९८ रोजी माजे लग्न नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील वडाळी येथील मंगल नावाच्या मुलीशी मुंबईला झाले. १८ मे १९९८ चाळीमध्ये संसार सुरु झाला. माझे साडू कै. सुरेश गोसावी व मेहुणे दीपक गोसावी हे आम्हास गावाकडून धान्य , रॉकेल इ. घेऊन येत वा आमच्या संसारास हातभार लावण्याचा प्रयत्न करीत असे.वडील, आई, बहिणी लग्नाला हजर होते. बहिणीने मदत करून लग्न केले. रेल्वेचे प्रवासभाडे खर्च चिंचवडचे श्री. अशोक गोसावी यांनी केला. आई खूप आजारी पडली तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते. पुण्यातील ससून मध्ये दाखल केले. आठ दिवस आई आजारी होती मी मात्र पायी चालत चालत पुण्यात हिंडत होतो. निवेदनाची कामे मागत होतो. त्यातच २९ मे १९९८ रोजी आई गेली तेंव्हा निर्णय घेतला. आता फक्त कलाकार व्हायचं, निवेदक व्हायचं.

आईचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते. माझे मित्र आदरणीय श्री. मंगेश वाघमारे यांनी मदत केली व आईला गावी शेतामध्ये समाधी दिली. वडील वयस्कर होते. त्यांना दम्याचा आजार होता. त्यांचा दवाखाना, सेवा मी व माझ्या पत्नीने केली. काहीतरी कामे निवेदनाची करायचो थोडे पैसे मिळायचे आमचे त्यातच भागायचे हॉटेलची नोकरी सोडल्यावर रु. ३००० /- मिळाले. त्यात आम्ही टेलीफोन विकत घेतला. पेपरमध्ये कार्यक्रम समजला की, फोन नंबर शोधून बोलायचे त्यातून कामे मिळायची. यातच १ वर्ष गेलं. १६ मे १९९९ ला आम्हांला मुलगा झाला त्याचे नाव विपुल.विपुलच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी करीत होतो, तोच १५ मे २००० रोजी वडिलांचे घरीच निधन झाले. त्यांना गावाकडे घेऊन जायला पैसे नव्हते. माझे मित्र आदरणीय श्री. मंगेश वाघमारे यांनी मला मदत केली. गावी समाधी दिली आणि आई व वडिलांचे छत्र हरपले.

निवेदकाची कामे करत होतो. जोड धंदा म्हणून आम्ही एक मशीन कर्जाऊ घेतले. अनंत नागरी पतसंस्था चिचवड, येथील श्री. राजाभाऊ गोलांडे व श्री. गजानन चिंचवडे या मित्रांनी मला शिलाई मशीन कर्जाऊ दिली. संसारातील एक एक वस्तू घेत होतो व संसार करीत होतो. २००१ साली आमच्या घरात मोबाईल आला. पिंपरी काळेवाडीचे प्रकाश मळेकर यांच्या वैष्णवी साडी सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास माझी ओळख झाली. त्यांनी पिंपरी चिंचवड सह. बॅंकेकडून रु. ५००० /- चे कर्ज दिले. श्री. मळेकर जामीन राहिले व महेश शेवाळे माझा कॉलेज मित्र त्याचे वडील जामीनदार राहिले आणि मोबाईल घेतला. त्याचा नंबर ९८२२११४७६० , आणि खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. त्यानंतर मी २००२ साली हिरो होंडा स्प्लेंडर घेतली. 

जयहिंद बँक चिंचवड चे संस्थापक अध्यक्ष मा. धनाजीराव विनोदे यांनी चिंचवड गावात अशी प्रथा सुरु केली. गणेश विसर्जनाच्या दिवशी मंडळाचे स्वागत करावयाचे त्यासाठी मला निवेदक म्हणून बोलावले. आमची ओळख झाली. रात्री २ वाजे पर्यंत कार्यक्रम चाले. रात्री बँकेचा शिपाई मला घरी सोडत असे.

एकदा विनोदे साहेब म्हणाले की, एखादी गाडी का घेत नाही. मी म्हणालो मला कर्ज कोण देणार? ते म्हणाले आम्ही देतो. बँकेत रुपये तीनशे भरून खाते काढले. हिरो होंडा स्प्लेंडर MH12 BQ 7118 ही गाडी मिळाली. जामीनदार म्हणून आकाशवाणी पुणे केंद्रातील मित्र श्री. विठ्ठल सुतार व सौ.वीणाताई खानविलकर होत्या. LIC Policy चे महत्व अमय इंगळे यांच्या कडून समजले. हेल्मेट घालून प्रवास सुरु झाला होता. सुतारवाडी पाषाण भागात राहत होतो. तेथे श्री. पी.डी.तापकीर एक बांधकाम व्यावसायिक माझे मित्र होते. नवीन स्कीम सुरु झाली व मला एक ‍फ्लॅट बुक करावा असे सांगितले. माझे स्वताचे घर असावे असे त्यांना वाटत होते. पाडव्याच्या मुहृतावर घर बुक केले होते. त्याचे मित्र सुनील उलागडे हे सी.ए. म्हणून काम करत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पेपर तयार केले. पाच लाख लोन कोणी देत नव्हते. भोसरीच्या आण्णासौ. मगर बँकेचे संस्थापक श्री. बाळासाहेब गव्हाणे यांनी मला लोन देण्याचे कबुल केले. पाच लाख लोन साठी जामीनदार कोण राहणार? माझे आकाशवाणीचे मित्र निवेदक आदरणीय श्री. मंगेश वाघमारे व सौ. वीणाताई खानविलकर हे जामीनदार राहिले व कर्ज मंजूर झाले. २००४ मध्ये मी माझा स्वतंत्र घरात रहावयास आलो. चाळीच्या छोट्या घरातून स्वताच्या मोठ्या घरात राहवयास आलो हा आनंद वेगळाच होता. 

चार खोल्यांचे घर अतिशय सुंदर गॅलरी. मी माझ्या व्हिजिटिंग कार्ड वर पूर्ण पत्ता टाकला. कार्ड नवीन लोकांना देत होतो. माझे निवेदानाचे काम जोरात सुरु होते. पावसाळ्यात प्रत्येक वेळी कार्यक्रमाला जायचे म्हणजे संपूर्ण भिजून जावे लागे. रेनकोट कितीही भारी असला तरी पूर्ण अंग भिजत असे. कार्यक्रमास गेल्यावर तिथे प्लास्टिकच्या पिशवीतील नेहरू शर्ट घालावा लागे. खूप हाल होत. स्वताची कार असावी त्यामुळे चांगला प्रभाव पडेल असे वाटे. त्यासाठी मी श्री. बाळासाहेब गव्हाणे यांना विनंती केली, कर्ज देण्यास ते तयार झाले. गाडी शिकण्यासाठी श्री. बाळासाहेब चव्हाण यांचे लाख मोलाचे मार्गदर्शन झाले. ते मी कधी विसरणार नाही. गाडी घेण्यासाठी जामीनदार श्री. विठ्ठल सुतार व माझा मित्र शेखर हे होते. १ जून २००७ रोजी MH12/5982 अल्टो ही गाडी घरी आली. मला गाडी चालवता येत नव्हती. माझे साडू कै. सुरेश गोसावी हे गाडी घेऊन घरी आले. गाडी कशी चालवायची हे माझे मेहुणे दीपक गोसावी यांनी शिकवले. 

या कालावधीत सर्व काही मिळाले. नावलौकिक ही मिळाला. आता माझा प्रवास वातानुकुलीत गाडीने सुरु झाला आहे. अशी माझ्या जीवनाची गाडी सुसाट धावते आहे.

माझा अल्पपरिचय
पूर्ण नाव: राजीव उर्फ रामहरी दिनकर गोसावी
जन्मतारीख: १९ सप्टेंबर १९६८.
शैक्षणिक पात्रता: कलाशाखेत पदवी(बी.ए.) पुणे विद्यापीठ
पत्ता: १२३/५ , पी. डी. तापकीर असोसिएट्स,प्रीयोगी प्लाझा , फेज नं.२ , फ्लॅट नं. २ , तळमजला,सुतारवाडी, पाषाण,पुणे-४११ ०२१
फोन नं.: ०२०-२५८७१०४७
मोबाईल नं.: ९८२२११४७६०
अवगत भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी.
व्यवसाय: सूत्र संचालन आणि निवेदन.